रत्नागिरी : निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधी लागणार, याची उत्कंठा गणेशोत्सवाच्या आधीपासूनच शिगेला पोहोचली असतानाच आज, शुक्रवारी निवडणूक आयोगाने १५ आॅक्टोबरचा मुहूर्त जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने ताब्यात घेण्याचे आदेशही तत्काळ देण्यात आले आहेत.जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे १५ आॅक्टोबरला मतदान होईल. लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात मतदारांची संख्या १२,१०,०३३ इतकी होती. लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी नवीन मतदारांची नोंदणी केली होती. त्यात जिल्ह्यात महिला आणि पुरुष मिळून एकूण १९ हजार २८६ मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. सर्व मतदारसंघांत मिळून ८ हजार ९२५ पुरुष आणि ८ हजार ९४९ महिलांची अशी एकूण १७ हजार ८७४ मतदारांची वाढ झालेली आहे.पदाधिकाऱ्यच्या गाड्या जमाजिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पदाधिकारी आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या गाड्या जमा करून घेण्यात आल्या आहेत. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, उपाध्यक्ष राजेश मुकादम, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती अजित नारकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर आणि नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची शासकीय वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली. (प्रतिनिधी)