रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असून गाैरी गणपतीचे विसर्जन मंगळवारी सर्वत्र झाले. नगरपरिषदेकडून शहरातील मांडवी किनारी तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
कोरोनामुळे विसर्जनासाठी भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. विसर्जनासाठी ज्या भाविकांना जाणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी विसर्जनाच्या मूर्ती नगरपरिषदेने ताब्यात देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील भाविकांच्या सूचनेनुसार ६६ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले शिवाय भाविकांसाठी शहरात कृत्रिम तलाव चार ठिकाणी उभारण्यात आले होते. माळनाका उद्यान येथील कृत्रिम तलावात ५३, लक्ष्मी चाैक येथे १०, विश्वनगर येथे १ व नूतननगर येथे २ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
मांडवी किनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी कार्यरत होते शिवाय सकाळीही सफाई कर्मचाऱ्यांनी मांडवी किनाऱ्यावर जाऊन सफाई केली. नगराध्यक्ष प्रदीप साळवी, आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ सफाई कर्मचाऱ्याची टीम सलग दोन दिवस कार्यरत होती.