रत्नागिरी : सरपंच त्याच ग्रामपंचायतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याने हे ग्रामपंचायत अधिनियममधील कलम १४चे उल्लंघन असून, अशा सरपंचाचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, असे अपील गाव विकास समितीचे मनोज घुग यांनी कोकण आयुक्तांकडे केले होते. हे अपील मान्य करत कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय रद्द ठरवला असून, हरपुडे (ता. संगमेश्वर) सरपंच दर्शना अनंत गुरव उर्फ संजीवनी संतोष गुरव यांचे सदस्यपद रद्द केले आहे.सरपंच गुरव त्याच ग्रामपंचायतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम करत होत्या. ग्रामपंचायत निधीतून सरपंच आणि व डेटा एन्ट्री ऑपरेटरचा पगार जात होता. सरपंच स्वतःचा पगार काढत असल्याने सरपंच हा त्याच ग्रामपंचायतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर राहू शकत नाही, अशी भूमिका घेत गाव विकास समितीच्या माध्यमातून मनोज घुग यांनी रत्नागिरीजिल्हाधिकारी यांच्याकडे २०२१ मध्ये अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले नव्हते.रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील बाळासाहेब टंकसाळे यांच्यामार्फत मनोज घुग यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे जुलै २०२२ मध्ये अपील दाखल केले.वर्षभर चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर कोकण आयुक्तांनी याबाबतचा स्पष्ट निकाल दिला असून, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे १८ एप्रिल २०२२ रोजीचे आदेश कोकण आयुक्तांनी रद्द केले आहेत.सरपंच ऑपरेटर म्हणून काम करू लागले तर ग्रामसेवकाने सरपंचाला सूचना कशा द्यायच्या? जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला आव्हान दिले गेले नसते, तर असे प्रकार अन्य ठिकाणी ही होऊ शकले असते, असे गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सांगितले.
Ratnagiri: हरपुडे सरपंचाविरोधातील जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कोकण आयुक्तांकडून रद्द
By शोभना कांबळे | Published: October 09, 2023 5:55 PM