रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी दुपारी अचानक परिसरातील विविध शासकीय कार्यालयांची पाहाणी केली. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी अस्ताव्यस्त सामान असलेल्या कार्यालयप्रमुखांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी अचानक भेट देत आवारातील कार्यालयांमधील स्वच्छतेची पाहाणी केली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी अचानक दुपारी परिसरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, आपत्ती निवारण कार्यालय, उपजिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, अभिलेख कक्ष,तहसीलदार कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालय, पर्यटन विकास महामंडळ,विशेष लेखा परिक्षक कार्यालय, परिसर आणि परिसरातील शौचालय, स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेची पाहणी केली.
यावेळी आवारात अस्ताव्यस्त सामान असलेल्या कार्यालय प्रमुखांची चांगलीच कानउघाडणी करतानाच यापुढे स्वच्छतेत सातत्य ठेवण्याबाबत कडक सूचना केल्या. अनावश्यक जुने साहित्य, अस्ताव्यस्त ठेवलेले साहित्य याबाबत सूचना करत जुने साहित्य निर्लेखीत करण्यास सांगितले. स्वच्छ, सुंदर, प्रसन्न वातावरणात माणसाचे मन देखील प्रफुल्लीत राहते. परिणामी त्याचा कामकाजावर सकारात्मक परिणाम राहतो. प्रत्येकांनी आपले कार्यालय आणि परिसर नियमित स्वच्छ ठेवा, असे त्यांनी कडक निर्देश दिले.
प्रत्येक कार्यालयांनी आपआपला मजला स्वच्छ ठेवावा. संपूर्ण इमारत स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे सांगून कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड मध्ये येण्याबाबतही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, स्वीय सहाय्यक संदीप सावंत सोबत होते.