रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ किलोमीटरचे अंतर चालून गुहागर तालुक्यातील गिमवीमधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन भेट दिली. साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पहिल्याच भेटीने आदिवासी जनता भारावून गेली. या वस्तीने मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.१ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. याच सप्ताहाच्या अनुषंगाने जनसंवाद या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी गुहागर तालुक्यातील गिमवी या गावच्या दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील कातकरी-आदिवासी बांधवांची भेट घेतली. मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. जनतेच्या समस्या, मूलभूत गरजा जाणून घेतल्या. रेशन कार्ड, जमिनीचा ७/१२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाचे शासकीय दस्तऐवजांचे वितरण यावेळी करण्यात आले.या आदिवासी वाडीतील गुणवंत व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी आदिवासी वाड्यांवर जाऊन भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने येथील ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Ratnagiri: डोंगर-दऱ्यांतून चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला भेट दिली, आदिवासी जनता भारावून गेली
By शोभना कांबळे | Published: August 04, 2023 4:26 PM