टेंभ्ये : जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेशी संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बोर्ड परीक्षेशी संबंधित जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश, जिल्हा शल्यचिकित्सक यांना नुकतेच दिले असल्याचे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यामधील प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले, परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण आदेश नसल्याने थांबविण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने येऊ घातलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे हित व परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत, मिश्रा यांनी परीक्षेसंबंधी नियुक्त लोकांचे तालुकानिहाय योग्य ते नियोजन करून शासकीय कोरोना लसीकरण केंद्रात संबंधित कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, असा आदेश दिला आहे.
‘ब्रेक द चेन’ या राज्य शासनाच्या निर्णयामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनीही लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे. राज्य शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलली आहे. शिक्षणाधिकारी स्तरावरून योग्य नियोजन केल्यास परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण होऊ शकतात. यासाठी गटशिक्षणाधिकारी स्तरावर लसीकरणाचे नियोजन करावे, अशी मागणी अध्यापक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.- सागर पाटील,अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ