रत्नागिरी : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेउन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गृह अलगीकरणाबाबत कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक आस्थापना, कार्यालये वगळता इतर कार्यांलये तसेच आस्थापनांमध्ये मर्यादित संख्या ठरवून दिली आहे. बुघवारी सायंकाळी हे आदेश निर्गमित करण्यात आले.
जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शिमगोत्सव सुरू झाल्याने आता संसर्ग अधिक वाढण्याचा धोका आहे, हे लक्षात घेऊन गृह अलगीकरणात असलेल्या रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी कडक नियम घालून दिले आहेत. त्यानुसार गृह अलगीकरण झालेले नागरिक, रुग्ण याविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे, तसेच ही व्यक्ती कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकांच्या (डॉक्टर) देखरेखीखाली आहे याचीदेखील माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक राहील. रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून १४ दिवसांपर्यंत प्रवेशद्वारावर किंवा दर्शनी ठिकाणी फलक लावावा. कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरण (home quaraintine) असा शिक्का मारणे. हा रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर कमीत कमी संपर्क ठेवून शक्य तितक्या मर्यादित हात्रचाली कराव्यात तसेच मास्क परिधान केल्याशिवाय इतरत्र वावर करू नये. गृह अलगीकरणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास असा रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
सवे कार्यालये - आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक आस्थापना वगळता) ५० टक्के क्षमतेच्या अधीन राहून सुरू राहतील. घरातून काम (home work) करण्याबाबत प्रोत्साहित करणे. सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेशे सामाजिक अंतर राखले जाइल, ही दक्षता घ्यावी. तसेच कारोनाच्या आनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन आदींचे पालन करण्यात यावे. मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतराबाबत अंमलबजावणीकरिता संबंधित आस्थापनांनी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संबंधित, जागामालक, आस्थापना, आयोजक यांना दंड आकारला जाईल.
पाॅईंटर
* सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल यामध्ये ५० टक्के संख्येची मर्यादा पाळावी.
* कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावे आयोजित करता येणार नाहीत. असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित जागा आस्थापना मालकाकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड वसूल केला जाईल.
* लग्न समारंभात ५०पेक्षा जास्त लोकांना परवानगी असणार नाही. त्याकरिता संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक राहील.
* अंतिम संस्कारासाठी २०पेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्यास मनाई राहील. याबाबतची दक्षता ग्राम कृती दल, नागरी कृती दल यांनी घ्यावयाची आहे.