शिवाजी गोरे-- दापोली --भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा सुरु ठेवण्यासाठी बाबासाहेबांच्या आंबडवे येथील भावकीने पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रयत्नातून बाबासाहेबांच्या मूळ गावात राज्यातील पहिले मॉडेल कॉलेज सुरु झाले आहे. या कॉलेजला बाबासाहेबांच्या भावकीने १४ एकर जागा दान देऊन ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाचे बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावात उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने अनेकांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. बहुजन व गरीब गरजूंना शिक्षण मिळावे, यासाठी संपूण आयुष्य खर्ची घालणाऱ्या महापुरुषाच्या गावात अनेकजण उच्च शिक्षणापासून वंचित होते. परंतु केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी एक कमिटी स्थापन करुन भारतातील ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाचा दर्जाबाबात सर्वे केला. संपूर्ण भारतात ३९४ जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. कमिटीच्या अहवालावरुन केंद्र सरकारने ३९४ जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी ३९४ मॉडेल कॉलेज निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात ६ मॉडेल कॉलेज मंजूर झाली. त्यापैकी ३ कॉलेज कोकणात आहेत. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एक कॉलेज सुरु करण्याचा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मॉडेल कॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावातच सुरु करावे. त्यासाठी लागेल तेवढी जमीन विनामोबदला दान देण्याचा निर्णय आंबेडकरी भावकीने घेतला व मुंंबई विद्यापीठाकडे पाठपुरावाही केला. मंडणगड तालुका अतिदुर्गम भाग आहे. येथील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली म्हणून हे कॉलेज आंबडवे या गावात सुरु झाले. या कॉलेजमध्ये पंचक्रोशीतील १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बाहेरगावी जाऊन ज्यांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती, अशा गरीब मुलांना बाबासाहेबांच्या पुण्याईने गावातच उच्च दर्जाचे शिक्षण मिळू लागले आहे.केंद्र स्व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशा स्वरुपाचे मॉडेल कॉलेज सुरु करण्यात येत आहे. या मॉडेल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, क्रीडा संकुल, अॅडीटोरिअम, दवाखाना, सुसज्ज कॉलेज, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. या कॉलेजमध्ये २०० मुलांच्या - मुलींचे वसतिगृह, मोफत शिक्षणाची सोय, भोजन, सर्वसुविधा दिल्या जाणार आहेत.जागा देणारे जमीनदार व त्यांचे वारस एकूण अशा ६९ जणांनी हा निर्णय घेतला असून, त्यांच्या सहकार्याने १० एकर जागेत महाविद्यालयाचे प्रशस्त गृहसंकुल उभे राहणार आहे. मॉडेल कॉलेजकरिता १२ कोटी रुपये शासनाकडून मिळणार असून, आंबडवे मॉडेल कॉलेज पहिले महाविद्यालय स्वत:च्या इमारतीत सुरु झाले आहे. मॉडेल कॉलेजच्या रुपाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या दोन-तीन वर्षात शिक्षणाची स्वप्ननगरी साकारली जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावकीच्या प्रयत्नाने त्यांना आदरांजली म्हणून हे कॉलेज सुरु कराण्यात आले आहे. ग्रामस्थांनी १४ एकर जागा दान देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. मुंबई विद्यापीठाने ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्स सुरु करुन चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल. ग्रामीण भागातील मुलांना चांगली संधी मिळाल्याने त्यांचा विकास होईल.- प्राचार्य, डॉ. गुलाबराव राजे, विद्यापीठ समन्वयक
कॉलेजला बाबासाहेबांच्या भावकीनेच दिली १४ एकर जागा
By admin | Published: September 07, 2014 10:45 PM