विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अगदीच वर्चस्वाची लढाई नसली तरी भविष्यात ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत जास्तीत जास्त ताकद वाढवण्याकडेच भर दिल्याचे दिसून येते.मागील निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपले स्वबळ वाढल्याची जाणीव झाली आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर अनेक ठिकाणी युतीतील या दोन घटक पक्षांची मने दुभंगली.नगर परिषद निवडणुकीत राज्यस्तरावर युती झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी अचानक जाहीर केले. मात्र, रत्नागिरी जिल्ह््यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायत याठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत स्वारस्यच न दाखवल्याने राज्यस्तरावर निर्णय होऊनही रत्नागिरी जिल्ह््यात युती होऊ शकली नाही.मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता युतीचा फायदा भाजपला मिळाला. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ फायदा करुन घेण्याकडेच लक्ष दिले. पक्षवाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाहीत. भाजपचे लोकप्रतिनिधी जिल्ह््यातून निवडून गेले, मात्र ते युतीपेक्षाही शिवसेनेच्या बळावर. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला स्वत:कडे असलेल्या स्वबळाची जाणीव झाली आणि ज्याठिकाणी बळ कमी आहे, तेथे भविष्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले.रत्नागिरी जिल्ह््यातही हाच प्रयोग सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत छोटा पक्ष असूनही भाजप युती करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येते. नुकसान सोसावे लागले तरी चालेल; परंतु स्वबळावर लढायचे, या मन:स्थितीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. आज ना उद्या आपले बळ नक्कीच वाढेल; त्यावेळी आपण नक्की निवडून येऊ, अशी मानसिकता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने ताकदीने प्रचार करून स्वबळ वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकल्याचे दिसून येते. येत्या निवडणुकीत भाजपला कितपत यश मिळते, हे येत्या २८ तारखेलाच समजून येणार आहे.स्वबळाची मानसिकताचिपळूण येथे बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी भाजपचा आजपर्यंत शिवसेनेने केवळ वापर करून घेतला. त्यातून भाजपच्या हाती काहीच गवसले नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे यापुढे युती नाहीच, असे आग्रही प्रतिपादन केले होते. त्यामुळे युतीमध्ये राहिल्याने आपला कधीच फायदा होऊ शकणार नाही, ही आता जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांची मानसिकता झाली असल्याचे दिसून येते.स्वबळावर लढण्याचे भविष्यात फायदेनगर परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने बाळगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते भविष्यातील निवडणुकीची तयारी करत आहेत. या निवडणुकीत भाजपला जास्त फायदा झाला नाही तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील, या मानसिकतेपर्यंत भाजपचे जिल्हास्तरीय पदाधिकारी आल्याचे दिसून येते.
भाजपसाठी निवडणूक रंगीत तालीम
By admin | Published: November 15, 2016 12:19 AM