रत्नागिरी : बदलत्या काळानुसार गुन्हा करण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल होत आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्य अशी सायबर लॅब असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सायबर लॅब कक्षाचे उद्घाटन रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आजचे युग हे सायबर युग असल्याने सोशल मीडिया किंवा बँक खाते तसेच प्रतिबंधित वेबसाईट याद्वारे हॅकींग होऊन आर्थिक गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी सायबर लॅब आवश्यक असल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पाहता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह््यामध्ये सायबर लॅब स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतही हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सायबर लॅबमुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच गुन्हेगारांची ओळख पटण्यासही यामुळे मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)
‘सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा’
By admin | Published: August 17, 2016 9:28 PM