पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या शाळा बंद पडू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक व लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन शासन दरबारी अडचणी मांडून प्रश्न सोडवला पाहिजे असे आवाहन जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे यांनी बोलताना केले.
जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. आत्माराम आयरे विद्यालयात आत्माराम आयरे यांचा ५० वा तर संस्थेचे विश्वस्त आप्पा आयरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार साेहळ्यात सुहास आयरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, शरद मोरे, मिळंद गावचे सरपंच कीर्ती आयरे, संस्थेचे विश्वस्त विकास आयरे, पोलीस पाटील प्रवीण मोरे, उद्योजक अविनाश मढवी, मुख्याध्यापक प्रकाश डोंगरकर उपस्थित होते. सुहास आयरे पुढे म्हणाले की, कठीण काळात आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी कायम कृतज्ञ व्हावे, कृतघ्न होऊ नये असे सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक महाडिक, सामाजिक कार्यकर्ते श्यामराव विश्वासराव, विनायक आयरे, शिक्षक योगेश आयरे, भगवान आयरे, गणेश कांबळे, सुरेश आयरे यांनी मनोगत व्यक्त केले.