रत्नागिरी : कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ३० ऑगस्टपासून गांधीधाम तिरुनेलवेल्ली साप्ताहिक सुपर फास्ट फेस्टिव्हल स्पेशल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पेशल गाडी पूर्णपणे आरक्षित असून, ३० ऑगस्टपासून दर सोमवारी कोकण मार्गावर धावणार आहे.
नुकसानाचा आढावा
आवाशी : खेड तालुक्यातील पंधरा गाव विभाग ग्रामीण संघाच्या कार्यकारिणीची बैठक धामणंद येथील श्री महालिंग मंदिराच्या सभागृहात झाली. ही बैठक गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनेतील नुकसानाबाबतचा आढावा घेण्यात आला.
छायाचित्र स्पर्धा
रत्नागिरी : येथील लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे पावसानंतरचा निसर्ग या विषयावर छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोबाईल अथवा डिजिटल कॅमेऱ्यावर फोटो काढून तो पाठविण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. यातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट छायाचित्र कॅप्शन, प्रेक्षकांची पसंती अशी प्रत्येकी एकूण ६ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
उपकेंद्राचे उद्घाटन
राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या पडवे उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून सुमारे २५ लाख ६० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बांधकामाचा शुभारंभ राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते झाला.
वाहनचालक त्रस्त
रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर ते आयटीआय या जोडरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयटीआयसमोरील रस्ताही पूर्णपणे उखडला आहे. समोरील रस्त्यावर डबर टाकण्यात आल्याने यावरुन वाहने घसरण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.