रत्नागिरी : आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली कोकण रेल्वेची विस्टाडॅम रेल्वे गुरुवारी पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावरून धावली. बोगीत प्रशस्त जागा, मोठमोठ्या खिडक्या तसेच प्रवाशांना हव्या तशा फिरवता येतील अशा खुर्च्या ही या रेल्वेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
खरं तर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते त्या मार्गावरील निसर्गसौंदय प्रत्येकाला भुरळ पाडत. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळं आकाश, डोंगर माथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही.
प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने विस्टाडॅम ही वेगळी रेल्वे तयार केली आहे. या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यू अनुभवता येतो.
मोठमोठ्या खिडक्यांबरोबरच बोगीत प्रशस्त जागा आहे. यातील खुर्च्या मागे-पुढे होतातच; पण गोल ही फिरतात. यामुळे प्रवाशांना हव्या तशा खुर्च्या फिरवता येतात. या स्पेशल बोगीत फ्रीज, डीप फ्रीजबरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत. सर्व सोयीसुविधा असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टाडॅम कोच सेवा असलेल्या रेल्वेचा पहिला प्रवास गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरून झाला. या बोगीचे छप्पर ही काचेचे असून, बोगीच्या मागील बाजूचे दालन विशेष आहे. यात उभे राहून मोठ्या काचेतून आपण कोकणचा निसर्ग अनुभवू शकतो.
चौकट
बुधवारी मुंबईत मध्य रेल्वेवर काही ठिकाणी प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी भरले होते. गुरुवारी सकाळी मात्र नवीन एलएचबी डब्यांच्या जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वेळेत प्रयाण केले. नंतर कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी रखडली आणि रत्नागिरी येथे तब्बल २५ मिनिटे उशिरा आली.
चौकट
या गाडीत जुन्या १४ ऐवजी १६ डब्यांच्या या गाडीची लांबी जास्त आहे. त्याचप्रमाणे डब्यांची जागा बदलली आहे. नवीन रचनेत गोव्याला जाताना इंजिन नंतर ६ दुसरा वर्ग- मध्ये ३ वातानुकूलित निळे डबे व परत ६ दुसरा वर्ग आणि १६ वा पूर्व रेल्वेचा निळा- पांढरा विस्टाडॅम डबा अशी रचना आहे.
प्रा. उदय बोडस यांचा मुहूर्त हुकला
कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सुरू झाली की, उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी कोरोनामुळे खंडित झाली आहे.
जून २०१९ मध्ये जेव्हा कोकणकन्या- मांडवी एक्स्प्रेसचे नवीन एलएचबी डब्यांच्या गाडीत परिवर्तन झाले, त्यावेळी प्रा. बोडस यानी मडगाव येथून उद्घाटनाचा प्रवास केला होता. तो त्यांचा २१ वा उद्घाटनाचा प्रवास होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हे स्तर ४ मध्ये आहेत आणि गोवा राज्य वेगळे असल्याने कोविडसंदर्भात चाचण्या अनिवार्य आहेत आणि वयाचा विचार करता प्रवास टाळणे इष्ट असल्याने हा प्रवास टाळला असल्याचे प्रा. बोडस यांनी सांगितले.