रत्नागिरी : शालेय स्तरावर सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी सुरू झाली असून, दि. १४ ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी केली जाणार आहे. ४५ दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या अभ्यासाची उजळणी सेतू अभ्यासक्रमाद्वारे होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. ‘शाळा बंद मात्र शिक्षण सुरु’ या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांच्या इयत्तानिहाय व विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहित धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयांसाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे.
सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या असून, या कृतिपत्रिका विद्यार्थी केंद्रीत, कृतीकेंद्रीत तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. कृतिपत्रिकांव्दारे विद्यार्थी स्वअध्ययन करु शकणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्या-त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक, पालक, शिक्षक मित्र, सहाध्यायी, स्वयंसेवक, विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्याची छपाई करुन त्यामध्येही सोडवू शकतात. जेणेकरुन शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.
सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने सोडवून घेऊन त्या तपासल्या जाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वत:कडे ठेवणे आवश्यक आहे, असे या सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. या अभ्यासक्रमाच्या पीडीएफ फाईल संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन प्रिंट करूनही वापरता येतील. सेतू अभ्यासक्रम www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.