चिपळूण : कळंबस्ते येथील रिक्त पदाअभावी बंद पडलेले (हॅचरिज) अंडी उबवणूक केंद्र भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी बैठकीत केली. कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालय खैरतोड प्रकरणात डॉ. संतोष निमुणकर दोषी आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांकडे दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी संयुक्त बैठकीत सांगितले.खैरतोड व पशुसंवर्धन विभागातील समस्यांविषयी पशुसंवर्धन अधिकारी व पंचायत समिती सदस्यांची संयुक्त बैठक झाली. गटनेते राकेश शिंदे यांनी खैरतोड प्रकरणाची माहिती दिली. यावेळी डॉ. पुजारी म्हणाले की, पंचायत समितीचा चौकशी अहवाल मिळाल्यावर डॉ. निमुणकर यांना कारणे दाखवा नोटीस दिली.
निमुणकर यांनी दिलेला खुलासा अमान्य केला. त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. यामध्ये कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत. डॉ. निमुणकर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव चार दिवसांपूर्वीच पशुसंवर्धन कार्यालयाला पाठवला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी पशुसंवर्धन कार्यालय आवारात अनेक धोकादायक झाडे आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्त समिती स्थापण्याचे ठरले. त्यामध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह राकेश शिंदे व नितीन ठसाळे यांचा समावेश केला. ही समिती सर्वेक्षण केल्यानंतर लिलाव प्रक्रिया राबवणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी उपसभापती शरद शिगवण, सदस्य विश्वनाथ साळवी, नितीन ठसाळे, सुनील तटकरे, रिया कांबळी, नंदू शिर्के, दीपाली पवार, प्रकाश कानसे, डॉ. संतोष निमुणकर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मयेकर, उपायुक्त डॉ. झनकर आदी उपस्थित होते.रिक्त पदांची जंत्रीयावेळी सभापती निकम म्हणाल्या की, पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. अंडी उबवणूक केंद्रही बंद आहे. ते भाडेतत्त्वावर दिल्यास शासनाला महसूल मिळेल. यातून शेतकऱ्यांचीही गैरसोय दूर होईल. तसा ठराव पंचायत समितीकडून देऊ, असे सांगितले.