रत्नागिरी : शहरानजीकच्या उद्यमनगर येथे सुमारे ७८ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महिला रुग्णालयाच्या सांडपाणी निचरा प्रकल्प तसेच अन्य निष्कृष्ट कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी केल्यानंतर या कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे जाहीर केले.
हे महिला रुग्णालय व समोरील सांडपाणी वाहून नेण्यासाठी शासनाने एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले होते. त्यातून सांडपाणी निचरा प्रकल्प उभारण्यात येणार होते. दोन वर्षे होऊनही बांधकाम विभागाने हा प्रकल्प पूर्ण न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांची दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी सोमवारी सायंकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महिला रुग्णालय आणि समोरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे पाणी वाहून नेण्यासाठी २०१८ साली एका ठेकेदाराला एक कोटी वीस लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करावयाचे होते, परंतु इमारत काही प्रमाणात पूर्ण झाल्यानंतरही सांडपाण्याचे काम पूर्ण न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर आणि लगतच्या गटारांमध्ये सोडण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जागेची पाहणी करून एक समिती नेमण्याचे जाहीर केले असून, या समितीने तातडीने आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी मिश्रा यांनी अर्धवट अवस्थेत असलेल्या समोरील इमारतींचीही पाहणी केली. हे कामही अपूर्ण असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, यावेळी त्यांनी संबंधित विभागाला चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुलेही उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सर्व कामांची पाहणी करून योग्य दखल घेतल्याबद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीला २७ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये वुमेन्स हाॅस्पिटल नावाने फोटो आहेत.