संदीप बांद्रे चिपळूण : साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे.डॉ. श्रीराम लागू यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्याविषयी चिपळुणातील नाट्यरसिकांच्या मनातील आठवणींना उजाळा मिळाला. साधारण १९७५पूर्वी चिपळुणात नाट्यगृहांची फारशी सुविधा नसताना डॉ. लागू यांची अनेक नाटके चिपळूणवासियांनी पाहिली.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या त्याकाळच्या अभ्यंकर रंगमंचावर त्यांचे अग्निपंख हे नाटक गाजले होते. त्यांच्या भूमिकेतून नटसम्राटही चिपळूणवासियांनी अनुभवला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कलावंतांच्या मदतीसाठी निधी उभारण्याकरिता मोठमोठ्या कलाकारांना सोबत घेऊन एक कार्यक्रम त्यांनी केला होता. या कार्यक्रमालाही प्रतिसाद दिला होता.नाट्यप्रयोग करताना ते कलाकार म्हणून वेळेला फार महत्त्व देत असत. त्यांचे बहुतांशी प्रयोग सायंकाळी ७ वाजता सुरू व्हायचे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत प्रयोग सुरू झाला पाहिजे, असा त्यांचा नाट्य संयोजकांकडे नेहमी आग्रह असायचा. पाच मिनिटे उशिरा त्यांचा प्रयोग सुरू झाला, असे कधीच घडले नाही. त्यामुळे त्यांच्या या स्वभावाची चिपळुणातील नाट्यरसिक आजही तितकीच आठवण काढतात.नाटक संपल्यानंतर किंवा आधी मोकळ्या वेळेत ते अनेकांशी संवाद साधत असत. त्यामुळे त्यांचा साधा व सरळ स्वभाव एकूणच त्यांच्यातील कॉमन मॅन आजही अनेकांना स्मरतो. डॉ. लागू यांच्या अभिनयातही फारसा उत्स्फूर्तपणा किंवा अतिरेकपणा नव्हता. अगदी सहजपणे त्यांचा अभिनयाचा भाव दिसत असे. त्यांच्या या अनोख्या शैलीतील अभिनयाला चिपळूणकरांनी नेहमीच दाद दिली.
केवळ सोबतच्या कलाकारांनाच नव्हे तर पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येकाची काळजी डॉ. लागू नेहमी घ्यायचे. शाकाहारी जेवण ते करत असत आणि त्यांना चिपळुणातील जेवण खूप आवडत असे. प्रत्येक कार्यक्रमाला आल्यानंतर ते नेहमी वृंदावन लॉज येथे थांबत असत. एकदा त्यांना अलिबाग येथे सोडण्यासाठी गेलो असताना त्यांनी अलिबागच्या बीचवर फेरफटका मारताना शिंपल्या जमवल्या होत्या. एवढ्या मोठ्या ह्यनटसम्राटाह्णमध्ये असलेला कॉमन मॅन मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवला.- श्रीराम कुष्टे, चिपळूण