लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे ताणतणाव वाढताहेत. त्यातून विविध प्रकारचे कलही निर्माण हाेत असल्याने व्यक्तींमध्ये वादाची दरी वाढत जात आहे. त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्य बिघडण्यावर होत आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सांभाळायचे असेल तर मनातील विचार व्यक्त करणे, हाच त्यावर उत्तम उपाय असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
कोरोनाकाळात सर्वच पातळींवर ताण-तणाव निर्माण झालेत. अनेक व्यक्तींच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात झाली. व्यवसाय ठप्प झाले. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती याआधीही कधीही निर्माण झालेली नव्हती. जागतिक स्तरावर याचे पडसाद उमटले असून आर्थिकचक्र थांबले आहे. सध्या काहीअंशी हे चक्र सुरू झाले असले तरीही अजूनही ते गतिमान होण्यास किती कालावधी लागेल, हे अनिश्चित आहे. सध्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मुले घरात आहेत. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यात चिडचिड वाढली आहे. काहींच्या नोकऱ्या सुटल्याने त्यांच्यात वैफल्य, नैराश्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. मात्र, घरातून मानसिक आधार मिळत नसल्याने त्यातून अशा व्यक्तींची घुसमट होऊ लागली आहे. ज्येष्ठ नागरिक यांचीही दिनचर्या घरातच राहिल्याने थांबली आहे. त्यांना कोरोनामुळे बाहेर पडण्याची भीती वाटत आहे. एकंदरीत एकमेकांकडे जाणे, व्यक्त होणे थांबल्याने विसंवादाची दरी वाढतेय. त्यामुळे त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर विपरित होत आहे.
मन हलके करणे हाच उत्तम उपाय
n कोरोनामुळे एकमेकांकडे जाणे थांबले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या गप्पा आता होत नाहीत. पण त्यातूनही फोनवरून का होईना शक्य होईल तेवढा संवाद ठेवणे गरजेचे आहे.
n मुले सध्या घरात असली तरी आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यातील संवादही कमी झाला आहे.
n मनस्वास्थ्य राखण्यासाठी संवाद प्रभावी माध्यम असून मन हलके होणे गरजेचे आहे.
विसंवादाची दरी
कोरोना काळात प्रत्यक्ष संवाद थांबल्याने व्यक्तीची अधिक घुसमट होवू लागली आहे. ही सर्व वयोगटांतील व्यक्तीमध्ये दिसून येत आहे. नातेवाइक, मित्र-मंडळी यांचे एकमेकांकडे येणे जाणे कमी झाले आहे. त्यामुळे अनेकांची घुसमट होत आहे. विविध प्रकारच्या कलहातून विसंवाद होत आहेत. यातून मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले असल्याने अनेकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
व्यक्त व्हायला शिका
मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. हे ताण दूर करण्यासाठी कुणाकडे तरी मन मोकळं करायला हवं. भावना व्यक्त करायला हव्यात. काही व्यक्तींना मन मोकळं करणे कमीपणाचे वाटते. तणावाशी सामना करण्यासाठी संवाद गरजेचा असतो. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेतल्यास तणावमुक्त होण्यासाठी मदत होते.
मानसाेपचार तज्ज्ञ म्हणतात.
कोरोनामुळे व्यक्तींमधील संवाद तुटला आहे. मात्र, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यक्तींमध्ये सुसंवाद होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनातील विचारांचा निचरा व्हायला हवा. सध्या बाहेर जाणे होत नसले तरी मनातील विचार डायरीत नोंदवायला हवेत. आत्मकेंद्री न रहाता, व्यक्त होणे, हाच उत्तम उपाय आहे.
- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.
सध्या मुलं-पालक, ज्येष्ठ नागरिक, पती-पत्नी, नवविवाहित आदी सगळ्यांमध्येच ताणतणाव आणि त्यातून कलह वाढल्याचे दिसून येते. व्यक्तीची होणारी घुसमट बाहेर पडायला हवी. त्यासाठी अशांनी आपल्या भावना मोकळ्या करण्याचा प्रयत्न करायला हवा.
- डाॅ. श्रुतिका कोतकुंडे, मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूण