रत्नागिरी : वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे.फेब्रुवारीपासून आंब्याची आवक किरकोळ स्वरूपात सुरू झाली आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज पाच ते सात हजार पेट्या विक्रीला जात आहेत. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. २००० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. शेतकरी सहा ते चार डझनच्या आंबा पेट्या भरून पाठवित असून, पेटीमागे मिळणाऱ्या दरात मात्र हजार रूपयांचा फरक पडत आहे. आतापर्यंत खत व्यवस्थापनापासून कीटकनाशक फवारणीपर्यंत केलेला खर्च विचारात घेता पेटीला मिळणारा दर फारच कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा कमी आहे. मात्र, दर सारखेच आहेत. वास्तविक दर वाढण्याची आवश्यकता आहे.थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम झाला. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतकरी बांधवांना खबरदारी घ्यावी लागली.होळीनंतर आंबा बाजारपेठेत वाढेल. मात्र, यावर्षी मे महिन्यात आंबा कमी असण्याची शक्यता आहे.
हवामानात बदल होऊ लागला असून, उष्णता वाढत आहे. त्यामुळे दि. १५ मार्चनंतर येणारा आंबा नक्कीच चांगला, मधुर चवीचा असणार आहे. शिवाय आवकही त्यावेळी वाढेल. होळीनंतर उत्तरप्रदेशातील लोक मुंबईत दाखल होतात. मुंबई उपनगरात विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आवक वाढली तरी दर बऱ्यापैकी स्थिर राहण्याची शक्यता आहे. हापूसने उशिरा का होईना, दिमाखात आगमन केल्याने खवैय्ये सुखावले आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांना थ्रीप्ससारख्या संकटाचा सामना करावा लागला आहे. थंडीमुळे फुलोरा झाला. परंतु त्या तुलनेत फळधारणा झाली नाही. शिवाय थ्रीप्स आटोक्यात न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा कमी असताना दर चांगले असणे अपेक्षित आहे. महागाई ज्या पटीने वाढत आहे, त्यापटीत दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दर स्थिर राहणे गरजेचे आहे.- राजन कदम,बागायतदार, शीळ-मजगाव.कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली असली तरी प्रमाण कमी आहे. २५ मार्चनंतर प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणाबरोबर कर्नाटक हापूस, बदामी, तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण निम्मे असतानाही दर मात्र सारखेच आहेत. आवक आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे. उर्वरित ४० टक्के आंबा मुंबई उपनगरातून विकला जात आहे. होळीनंतर आंब्याची आवक वाढेल.- संजय पानसरे,संचालक, बाजार समिती, वाशी.