असगोली : नुकसानभरपाई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे मिळणार की ‘निसर्ग’ वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार, हे अजूनही नक्की व्हायचे आहे. मात्र, बाधित जनतेचा सहानभूतीपूर्वक विचार करून आपण पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
ते गुहागर पंचायत समितीच्या ‘तौउते’ वादळ नुकसान आढावा बैठकीत बोलत होते.
गुहागर तालुक्यात १३४ घरे, ३ गोठे, जिल्हा परिषद शाळांचे ३ रंगमंच, २ ग्रामपंचायत इमारती, २ सार्वजनिक शौचालये, २ स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. ४ गुरे दगावली आहेत. १४ फळझाडांचे नुकसान झाले आहे. १ मासेमारी बोट, १ गांडूळ खताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे. सुमारे ८५ हेक्टरवरील फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अहवाल या बैठकीत ठेवण्यात आला.
तौउते वादळात महावितरणचे १५० उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब आणि ३५० लघु दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे १७,४०० ग्राहकांचा वीजपुरवठा आजही खंडित आहे. पालशेत, आबलोली आणि गुहागर शाखा कार्यालय क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशी माहिती रानवीच्या शाखा अभियंत्यांनी दिली.
यावेळी आमदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई दिली गेली, तर अंशत: नुकसानीपोटी एका घराला ५ हजार रुपये मिळतात; पण निसर्ग वादळातील निकष महाराष्ट्र शासनाने लावले, तर त्याच घराला १५ हजारांची नुकसानभरपाई मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल, म्हैस दगावले, तर ३५ हजारांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. कृषी विभागाने पंचनामे करताना वादळात पिळवटून गेलेल्या झाडांचाही विचार करावा. नुकसानभरपाईचे पंचनामे कसेही केले तरी जनतेला अधिक भरपाई मिळेल, हे आपण शोधून काढले पाहिजे. त्यानुसार पंचनामे करावेत. जेणेकरून बाधितांना योग्य मोबदला आपण देऊ शकू. महावितरणचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. ४५० विजेचे खांब उभे करण्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंत्राटदारांची पथके बोलवावी लागतील. यासंदर्भात आपण कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.