खेड : ताैत्के वादळामुळे खेड तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत द्या, शासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी खेडचे माजी सभापती विजय कदम यांनी केली.
मुख्यमंत्री तसेच कृषी व फलोत्पादन मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळापूर्वी आलेल्या वादळाने खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची घरे, गोठे जमीनदोस्त झालेली आहेत. त्याचे पंचनामे होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन ही त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ते मदतीपासून वंचित आहेत. तहसीलदार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही त्यांची कुणी दखल घेत नाही. अशा शेतकऱ्यांनाही त्यांची नुकसानभरपाई विनाविलंब मिळणे गरजेची आहे. कोकणातील शेतकरी अडचणीत आहे.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळात बागायती उद्ध्वस्त झाल्या. यावर्षी तयार झालेले आंब्याचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हताश झालेला आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी विजय कदम यांनी केली आहे.