लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु असताना भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. अशातच पंचनामे करताना भाडेकरूंकडे करारनाम्याची मागणी केली जात असल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी ज्यांचे नुकसान त्यांनाच भरपाई मिळणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
महापुरामुळे चिपळूण शहरातील ९० टक्के भाग बाधित झाल्याने घरे, गोठे, दुकान, वाहन, शेती व सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या महापुरामुळे भाडेकरूंनाही तितकाच फटका बसला आहे. याआधीच कोरोनामुळे हवालदिल झालेले भाडेकरू, दुकानदार तर या महापुरामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. याआधी लॉकडाऊनमुळे व्यापार झाला नाही आणि आता महापुरामुळे होते नव्हते ते सारेच वाहून गेले आहे. त्यामुळे भाडेकरू अडचणीत आला आहे. चिपळूण बाजारपेठेतील काही दुकानदारांचे मासिक भाडे २५ हजारांपासून १ लाखांपर्यंत आहे. त्यातच लॉकडाऊन कालावधीत व आताही प्रतिज्ञापत्र व करारनाम्याची प्रक्रिया बंद होती. त्यामुळे अनेक भाडेकरूंकडे करारनामे उपलब्ध नाहीत तर काहींचे करारनामे पुरात वाहून गेले आहेत.
येथील बाजारपेठेतील जुन्या पेढ्या बंद पडल्याने बहुतांशी दुकाने भाडेकरूंच्या ताब्यात आहेत. तसेच लोटे, खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीतील कामगार व आजूबाजूच्या गावातील लोक नोकरीनिमित्ताने चिपळुणात भाड्याने राहतात. त्यामुळे शहरात किमान ३ हजारहून अधिक भाडेकरू कुटुंब व दुकानदार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुकान व घर मालकांऐवजी भाडेकरूंना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. याविषयी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्या असून, ज्या भाडेकरूंचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, परंतु तेथे भाडेकरूंचे नुकसान झाले आहे तर भाडेकरूंनाच नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यानुसार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही पंचनामा करणाऱ्या पथकांना सूचना दिल्या आहेत. तरीही काही कर्मचारी भाडेकरू असलेल्या पूरग्रस्तांकडे करारनाम्याची मागणी करत असल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे.
------------------------------
महापुरात सर्वांचेच सरसकट नुकसान झाले आहे. यामध्ये भाडेकरूही भरडले गेले आहेत. मात्र, आता पंचनामे करताना भाडेकरूंना करारनामा आहे का, अशी विचारणा केली जात आहे. तसेच आधारकार्ड, बँक खाते याची कोणतीही माहिती न घेता पंचनामे केले जात आहेत. शिवाय पंचनामे झाल्याची कोणतीही पोच मिळत नाही. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही.
- मंगेश वरपे, खेंड, चिपळूण.
---------------------------
महापुरात ज्याचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येकाला भरपाई मिळणार आहे. मग त्यामध्ये मालक असो अन्यथा भाडेकरू. जर घरात पाणी गेले, पण नुकसान भाडेकरूचे झाले तर नुकसानभरपाई भाडेकरूलाच मिळाली पाहिजे, अशाच पद्धतीच्या सूचना सर्व पंचनामे करणाऱ्या पथकांना देण्यात आल्या आहेत.
- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण.