राजापूर येथील दाैऱ्यावर आलेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत आमदार राजन साळवी यांनी चर्चा केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
कोकण विभाग खरीप हंगाम नियोजन पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कोकण दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यानिमित्ताने राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील कृषी विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत उभारलेल्या कलिंगड विक्री स्टॉलला भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये आमदार साळवी यांनी, कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांचे झालेले नुकसान तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे व कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला कमीत कमी १५० ते १६० रुपये दर मिळण्याची मागणी केली. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचीही मागणी केली.
यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्रभारी उपविभागीय अधिकारी बनसोडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर गटविकास अधिकारी पाटील, राजापूर तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, राजापूर सभापती प्रमिला कानडे, लांजा सभापती मानसी आंबेकर उपस्थित होते.