शृंगारतळी : कोकणात मेरिटाईम विद्यापीठ आणण्याचा मी प्रयत्न करीत आहे. नितीन गडकरी व माझ्यामध्ये यावरून स्पर्धा लागलेली आहे. गडकरी विद्यापीठ पुढे पळवत आहेत, विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. फक्त आपल्या मतदारसंघात नाही. ते जयगडमध्ये नेण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण विभाग त्यांचा आहे व मी दापोलीसाठी प्रयत्न करत आहे. आपले जोराचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी माध्यमिक शाळेच्या कार्यक्रमात केले.गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सरस्वती विद्यामंदिरच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, जोत्स्ना देशमुख, विलास वाघे, वैशाली पाटील, हर्षदा डिंगणकर, शिल्पा कामत, मुख्याध्यापक पोळ, योगिता खाडे, संस्थेचे अध्यक्ष संतोष साळवी, सचिव डी. एल. साळवी, सचिन कदम, महेश नाटेकर, प्रभाकर देसाई, यशवंत देसाई, मनोहर साळवी, हरिश्चंद्र साळवी, सुरेश साळवी, सुधाकर साळवी, दिलीप साळवी, शिवाजी साळवी, वसंत खेतले उपस्थित होते.पुढे गीते म्हणाले की, मी एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सूचना केली आहे की, यापुढे निदान महाराष्ट्रात विनाअनुदानित संस्था असता कामा नयेत, शेवटी शिक्षण देणे राज्यकर्ते म्हणून शासनाची जबाबदारी आहे. प्राथमिक शिक्षण देणे, ही जिल्हा परिषदेची व उच्च शिक्षण देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. आज या संस्था सरकारला सहकार्य करत आहेत. एक विचार मनामध्ये येतो, या संस्था नसत्या तर महाराष्ट्राची शिक्षणाची अवस्था काय झाली असती. म्हणून ज्या संस्था सरकारला सहकार्य करतात, यापुढे विनाअनुदानीत शब्द काढून टाका, सगळ्या संस्था अनुदानित करा, असे गीते म्हणाले. कुलगुरू देशमुख यांनी पर्यावरण रक्षणासाठी आवाहन केले. सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक सुदेश कदम यांनी केले. यावेळी गीते यांनी संस्थेसाठी दहा लाख रुपये देणगी देण्याची जाहीर केले. (वार्ताहर)
‘मेरिटाईम’वरुन गडकरींशी स्पर्धा : गीते
By admin | Published: April 24, 2016 10:05 PM