दापोली : अन्य उमेदवाराची जात पडताळणीबाबतची कागदपत्रे आणण्यासाठी आपण गेलो असताना उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी आपल्याला शिवीगाळ केली. जानेवारी महिन्यातील या घटनेबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती जामगे येथील यास्मिन हवा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडलेला नसून, हवा यांनीच गोंधळ केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी दिली.
पत्रकार परिषदेत यास्मिन हवा म्हणाल्या की, नुकतीच झालेली जामगे ग्रामपंचायतीची निवडणूक पंचायत समितीच्या माजी सभापती तबस्सुम बानू मुराद हवा यांनी इतर मागास प्रवर्गातून लढवली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जातीच्या प्रमाणपत्राची प्रतही जोडली होती. हे जातीचे प्रमाणपत्र दापोलीचे उपविभागीय अधिकारी यांनी ३१.०१.२०१७ रोजी दिले होते. हे प्रमाणपत्र काढताना हवा यांनी जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळाव्यात, यासाठी आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय, दापोली येथे २२ जानेवारी २०२१ रोजी अर्ज केला होता. त्यावेळी आपल्याला २९ जानेवारी रोजी कागदपत्रं देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आपण पतीसह या कार्यालयात २९ जानेवारी रोजी सकाळी गेलो. मात्र, आपल्याला उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊ देण्यात आली नाही. सायंकाळी ६ वाजता आपण त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात गेलो व माहितीबाबत विचारणा केली, तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी आपल्याला शिवीगाळ करुन कक्षाबाहेर जाण्यास सांगितले.
त्यानंतर आपल्याला पोलीस कर्मचारी दापोली पोलीस स्थानकात घेऊन गेले. तेथे आपली तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे आपण झाल्या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. मात्र, महिना झाला तरीही अद्याप त्याची कोणीही दखल घेतलेली नाही.
यासंदर्भात आपण खेड दौऱ्यावर आलेले कोकण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्यांनी ती अधिक चौकशीसाठी चिपळूणचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे दिली आहे.
..........................
असे काही घडलेच नाही
या संदर्भात दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता, यास्मिन हवा तक्रारीत म्हणतात तसा कोणताही प्रकार आपल्याकडून घडलेला नाही. त्यांनीच आपल्या कक्षात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. यास्मिन हवा यांनी पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीची चौकशी चिपळूणचे पोलीस उपअधीक्षक करत असल्याचेही पवार यांनी सांगितले.