रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. मात्र, खासदार विनायक राऊत प्रकल्प विरोधी भूमिका घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. खासदारांच्या या प्रकल्पविरोधी भूमिकेमुळे राजापुरातील शिवसैनिकांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन तक्रार केली आहे.राजापूर विभागप्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आले आहे. रत्नागिरी येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान हे पत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.बारसू येथे रिफायनरी होण्यासाठी जनतेचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून अनुकूलता दर्शवली होती. पक्षप्रमुखांच्या या भूमिकेनंतर स्थानिक आमदार राजन साळवी यांनीही रिफायनरी प्रकल्प राजापुरात झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी आग्रहही धरला. शिवसेना पक्षप्रमुखांची ही भूमिका असतानाच पक्षाचे खासदार विनायक राऊत प्रकल्पविरोधी भूमिका मांडत आहेत.
त्यांनी विरोधाचा सूर अजून कायम ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी उमटली आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेमुळे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात थेट पक्षनेतृत्वाकडेच तक्रार करण्यात आली आहे.
राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत देण्यात या पत्रावर शिवसेनेच्या सदस्यांपर्यंत आलेल्या या पत्रावर विभागप्रमुखांपासून ग्रामपंचायत शिवसैनिकांच्या सह्या आहेत. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीचे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे, असे या पत्रात म्हटले आहे. राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावांत विरोधाचा सूर आहे. त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरूप देण्यासाठी शिवसेनेने सहकार्य करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
समज देणार की ?
शिवसैनिकांच्या या पत्राचा पक्षनेतृत्व विचार करणार का, हेच पाहायचे आहे. पक्षाचे नेतृत्व प्रकल्प होण्यासाठी पत्र देतात तर दुसरीकडे पक्षाचेच खासदार विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे खासदारांना समज देणार का, हेच पाहायचे आहे.
नोकरीची संधी
तरुणपिढीतील मूल ही नोकरीधंद्याच्या शोधात पुणे, मुंबईला जातात. हा महाकाय प्रकल्प राजापूरला झाला तर स्थानिकांना नोकरीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील, अशी भावना या पत्रातून व्यक्त केली आहे.