चिपळूण : तालुक्यातील शिरगाव, अलाेरे, बाेरगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यास विलंब हाेत असल्याचा आराेप तक्रारदार विद्याधर दत्ताराम साळुंखे यांनी केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस महासंचालक यांच्याकडे सर्व कागदपत्रे दाखल करून तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
तालुक्यामधील शिरगाव, अलोरे आणि बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी चिपळूण पंचायत समिती आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील विभागांचे सकृतदर्शनी अहवाल प्राप्त झालेले होते. त्यानुसार भ्रष्टाचार, अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, निधीचा अपव्यय आणि अपहार झाल्याचे कार्यालयीन दस्तऐवजाआधारे सिद्ध झाले होते. त्याबाबत पुढील कार्यालयीन प्रक्रिया, शासन निर्णयानुसार कारवाई करण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांकडून निर्धारित वेळेत कारवाई होण्यास विलंब होत असल्यामुळे विद्याधर दत्ताराम साळुंखे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सर्व कागदपत्रांच्या आधारे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस महासंचालक विभागानेसुद्धा तक्रारीची दखल घेऊन ग्रामविकास प्रधान सचिव यांना पत्र पाठवून या तक्रारीसंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तपासासाठी प्राधिकृत करण्याची मागणी केली आहे. त्या पत्राच्या आधारे आता प्रधान सचिव कार्यालयाने जिल्हा परिषोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन या तक्रार अर्जात सत्यता आढळल्यास भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम १९८८मधील कलम १७ (अ) कार्यवाहीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना प्राधिकृत करण्यासाठी कार्यवाही कालमर्यादेत करण्यात यावी, असे कळविले आहे.