खेड : पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तसेच खेड नगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती संपदा गुजराथी यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुजराथी म्हणाल्या की, मी पक्ष स्थापने पूवीर्पासून राज ठाकरे यांच्यासोबत खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सामाजिक कामाची आवड असल्याने वेळोवेळी संधी मिळत गेली.
नगरसेविका नगरपरिषदेच्या सभापतीपदीदेखील काम करण्याची संधी मिळाली.या पक्षात काम करत असताना राजवैभव पतसंस्थेच्या संचालक पदी आपण काम करण्याची संधी मिळाली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून मला पक्षांमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत आहे.
सुमारे २५ दिवसांपूर्वी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडे हा प्रकार निदर्शनासही आणून दिला होता. मात्र त्याविषयी कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपण पक्षाच्या सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा आणि राजवैभव पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बाबतीत अशा प्रकारे पक्षांतर्गत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना कशी वागणूक मिळत असेल याचा पक्षश्रेष्ठींनी देखील विचार करणे गरजेचे आहे. काही पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप संपदा गुजराथी यांनी केला.