रत्नागिरी : हरवलेल्या वस्तूंबाबत तक्रार नोंदवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे मिसिंग पोर्टल तसेच न्यायालय आणि पोलीस यांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी कोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे.
जिल्ह्यातील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुध्द पुरावे गोळा केले जातात. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलीस, सरकारी अभियोक्ता व इतर विभागांशी समन्वय साधण्याचे काम कोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम तथा सीएमएस या प्रणालीद्वारे होणार आहे. न्यायालयीन खटल्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी व सामान्य नागरिकांना लवकर न्याय देण्याच्या दृष्टीने सीएमएस प्रणाली डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सुरू केली आहे. या कार्यप्रणालीसाठी कोर्ट पैरवी अधिकारी यांना पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले.
नागरिकांच्या सोयीसाठी गहाळ झालेल्या वस्तूंबाबत तक्रार करण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. हरवलेला मोबाइल, सर्व प्रकारचे दाखले, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधार कार्ड व इतर वस्तूंबाबत नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येईल. https://rtnpolicelostfound.in/ या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड तसेच इतर परिसरातील नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, अथवा खराब झाली आहेत. अशा लोकांना ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध झाल्याने दिलासा मिळणार आहे. याचा फायदा विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच विद्यार्थी यांना होणार आहे.