रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड यादरम्यानचे अजूनही संथगतीने काम सुरू आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथील कामाला गती देऊन गणेशोत्सवापर्यंत मुंबईगोवामहामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा, असे आदेश त्यांनी मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत दिले.मुंबई-गोवामहामार्गाच्या कामाच्या प्रगतीसंदर्भात मंत्री चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांकडून मंत्री चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामांचा आढावा घेतला. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करुन हा मार्ग लवकरात लवकर खुला कसा करता येईल, यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.अजूनही आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड येथील रस्त्यांचे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू आहे, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत त्याची कारणे अधिकाऱ्यांना विचारली. या कामांमध्ये तांत्रिक व आर्थिक निधीबाबतच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. परंतु ३० जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.महामार्गावरील कशेडी बोगद्याचे कामही काही प्रमाणात झाले आहे. त्यातील अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून, बोगद्यामधली एक बाजू गणेशोत्सापूर्वी वाहतुकीसाठी खुली करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा, मंत्री रवींद्र चव्हाणांचे आदेश
By मनोज मुळ्ये | Published: June 20, 2023 5:03 PM