रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.
शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करण्याचे छोटे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या या प्रयत्नांमुळे कचऱ्याची समस्या अंशत: सोडविण्यात रत्नागिरी नगर परिषदेला यश आले आहे.गेल्या महिनाभरापासून शहरात स्वच्छ सर्वेक्षण ही शासनाची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेनुसार शहरातील सर्व ३० वॉर्डमध्ये टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.
जून २०१८पर्यंत ही सर्वेक्षण योजना सुरू राहणार असून, त्याद्वारे शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन कसे करावे, संकलन कसे करावे, याबाबतची घडी बसवली जाणार आहे. सध्या ७, ८, १४ व अन्य काही वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजनेनुसार घंटागाड्यांवर ओला व सुका कचरा असे नागरिकांकडूनच वर्गीकरण केलेला कचरा स्वीकारला जात आहे.आतापर्यंत ज्या वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजना राबवली आहे त्यानुसार तेथील ७० टक्के नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून व्यवस्थितरित्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर देण्यास सुरूवात केली आहे. या योजनेचे रत्नागिरी शहराचे काम कार्पे या पुण्यातील एजन्सीकडे देण्यात आले असून, त्यांचे ३० कर्मचारी ही योजना योग्यरित्या राबविण्यासाठी शहरात कार्यरत आहेत.रत्नागिरी शहरात २०१७मध्ये भाजपचे तत्कालिन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगर परिषदेजवळील मोकळ्या जागेत ओल्या कचऱ्याचे कंंपोस्ट खत बनविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर आता शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये नगर परिषदेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंपोस्ट खताचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
हे प्रकल्प छोटे असले तरी ओल्या कचऱ्यांबाबतची समस्या तरी काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. कचऱ्याची समस्या सोडविणे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेतर्फे स्वच्छता अॅपही देण्यात आले असून, ते सुमारे २२०० नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. त्यावर आलेल्या १६५ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.कचराकुंड्या उचलण्यात आल्यानंतर त्या कुंड्यांच्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे अशा ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर कचरा टाकण्याचे प्रमाण घटले. अशा जागेवर कचरा टाकणे पूर्णत: बंद व्हावे, यासाठी आता त्या जागांवर नगर परिषदेतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे कचरा टाकणे बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.