लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन सेवा पुरविणारे २७ हजार संगणक परिचालक ग्रामविकास विभागांतर्गत सीएससीमार्फत गेली अकरा वर्षे कार्यरत आहेत. संगणक परिचालक ग्रामस्तरावर सर्व ऑनलाईनची कामे वेळेत पूर्ण करतात. परंतु, त्यांना शासनाकडून गेली ११ वर्षे सहा ते सात हजार रूपये मानधन देऊन राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर ऑनलाईनची कामे करणाऱ्या संगणक परिचालकांना नामविस्तार करून सहाय्यक ग्रामसेवक पदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे करण्यात आली आहे.
गेली अकरा वर्षे कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांना मानधनासाठी सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. अनियमित मानधनामुळे हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. संगणक परिचालकांकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी वेळोवेळी मुंबई, नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. प्रत्येकवेळी आश्वासने देऊन बोळवण करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही.
राज्यात विस्तार अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता नसून गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना सहाय्यक ग्रामसेवक या पदाची गरज असल्याचे ग्रामसेवक युनियनने म्हटले आहे. ज्या कोट्यातून अतिरिक्त मागणी होत आहे ते न करता, संगणक परिचालकांना त्यांच्या मानधनासाठी हा निधी वापरण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मानधनाच्या कोट्यातून किमान पाच हजार मानधन वाढवून देऊन त्यांना महाराष्ट्रात संगणक परिचालकांना पदाचा नामविस्तार करून सहाय्यक ग्रामसेवक पदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आता राज्य ग्रामसेवक युनियन शासनाकडे करणार आहे.