रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने हजेरी लावली होती. दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम आंबा हंगामावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या वातावरणाने बागायतदारांबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढवली आहे.जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका असतो; परंतु सध्या वातावरणातील बदलामुळे सोमवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर थंडीऐवजी अवकाळी पावसाचा मेघगर्जनेसह जोरदार वर्षाव जिल्ह्यात झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, दिवसभर मळभच होते. मात्र, काहीसा गारवा जाणवत होता. बुधवारीही सकाळपासूनच पावसाची शक्यता वाटत असली तरीही मळभाचे वातावरण कायम आहे.उत्तरेकउील शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टीपरील भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे; मात्र सध्या पावसाला अनुकूल असलेले वातावरण तयार होत असल्याने हवामान खात्याने कोकणासह महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जानेवारी महिना थंडीचा महिना समजला जातो; परंतु सध्या वातावरणात चमत्कारिक बदल दिसू लागले आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. सर्दी - खोकला, तापसरी याबरोबरच श्वसनाचे विकारही वाढले आहेत. त्याचबरोबर सध्या आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे.आंबा, काजू या फळपिकांना मोहोर येऊ लागला आहे. परंतु सध्याच्या या मळभाच्या वातावरणामुळे या पिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांचीही चिंता अधिकच वाढली आहे.
वातावरणातील बदलाने चिंता वाढली, शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
By शोभना कांबळे | Published: January 10, 2024 3:44 PM