रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेची सांगता झाली.
रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना आणि या क्षेत्रातील संशोधनाची दिशा यासंबंधी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘रिसेंट ट्रेडस इन ऑरगॅनिक अँड इनऑरगॅनिक केमिस्ट्री’ या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रसायनशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत नामवंत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी देशाच्या विविध राज्यांतील ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कार्यशाळेचा औपचारिक समारोप आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी कार्यशाळेसाठी लाभलेल्या सर्व तज्ज्ञांचे, सहभागी विद्यार्थीे तसेच शिक्षक आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, वेस्ट इंडिया सेक्शनच्या डॉ. लक्ष्मी रविशंकर यांचे आभार मानले.