रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या ६८ पैकी ४४ रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वत:च्या रुग्णवाहिका घ्याव्यात, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री परब यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, समाजकल्याण सभापती कदम व अन्य उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव हेही ऑनलाईन सहभागी झाले होते.
यावेळी कोरोना स्थितीचा आढावा घेतानाच एकूण आरोग्याच्या परिस्थितीवरही चर्चा झाली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांचा प्रश्नही समोर आला. जाधव यांनी ६८ पैकी ४४ रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होते. हे रुग्णांच्या जीविताला धोकादायक ठरू शकतात. त्यासाठी नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिका बदलणे आवश्यक आहे, असे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन १५ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्याचवेळी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनही काही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती अध्यक्ष जाधव यांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी या रुग्णवाहिका मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याची पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली.