रत्नागिरी : इव्हीएमद्वारे होणाऱ्या निवडणुकांची यंत्रणांना सवय आहे. तथापि शिक्षक संघातील निवडणूक कामकाज सर्व नियम व शिस्त पाळून करा, अशा सूचना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विशाल सोलंकी यांनी आज दिल्या.
निवडणुकीबाबत करण्यात आलेले नियोजन आणि तयारी याचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात घेतला. शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत आत्तापर्यंत झालेले कामकाज तसेच प्रत्यक्ष मतदान दिनाची तयारी, मतदान केंद्राचे नियोजन, वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले.पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या निवडणुकीत लागणाऱ्या बंदोबस्ताबाबत माहिती दिली.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १७ मतदार केंद्र असतील. जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची संख्या ४१२० आहे. मतमोजणी विभागीय स्तरावर एकत्र होईल. या मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी (प्र.) शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव यांची उपस्थिती होते. इतर ठिकाणचे सर्व प्रांत तसेच तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
तालुकानिहाय मतदान केंद्राची संख्या अशी – मंडणगड -१, दापोली-१, खेड-१, चिपळूण-४, गुहागर-१, संगमेश्वर-३, रत्नागिरी-२, लांजा-१ आणि राजापूर-३. जिल्ह्यात एकूण ४,१२० मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या २,७४२ असून स्त्री मतदार संख्या १,३७८ आहे.