रत्नागिरी : जिज्ञासू व हौशी खगोल अभ्यासकांच्या कार्यास उर्जितावस्था प्राप्त व्हावी या उद्देशाने रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील खगोल अभ्यास केंद्राच्या सहभागाने बारावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन आयाेजित करण्यात आले आहे. हे संमेलन दि. १५ ते १७ एप्रिल अखेर महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी श्रीनिवास औंधकर (औरंगाबाद), सचिन मालेगावकर (नाशिक), प्राचार्य डाॅ. पी. पी. कुलकर्णी, प्रा. प्रमोद भिडे उपस्थित होते.कोकणाला अनेक विद्वान गणिती व खगोल अभ्यासकांची परंपरा लाभली आहे. खगोलशास्त्रावर आधारित पंचाग सुधारणेच्या शंभर वर्षांपूर्वीच्या चळवळीत मूळ कोकणातील असलेले विसाजी रघुनाथ लेले, ठाण्याचे केरोपंत छत्रे, लोकमान्य टिळक तसेच व्यंकटेश बापुजी केतकर आणि अलीकडील कृवि सोमण आणि दा. कृ. सोमण ही नावे कोकणाशी संबंधित आहेत.
पाश्चात्य धर्तीवर आकाश निरीक्षणाचे ‘आकाशाचे देखावे’ हे पहिले मराठी पुस्तक तर रत्नागिरीच्या पहिल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक केळकर यांनी लिहिले आहे. रत्नागिरीतील र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे खगोल अभ्यास केंद्र हे विद्यार्थी व जनसामान्यात खगोलशास्त्राविषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी अनेक वर्ष कार्यरत आहे.या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील खगोल अभ्यासक प्रथमच कोकणात एकत्र येत आहेत. खगोलाच्या विविध विषयातील व्याख्याने, निरीक्षणे प्रात्यक्षिके आणि आधुनिक माहिती सहभागींना मिळणार असून, सहभागी होण्यासाठी इच्छूकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विशेष खगोलीय घटना निरीक्षणाची विशेष संधी खगोल अभ्यासकांना मिळणार आहे.पंचांग म्हणजे फलज्योतिष नाही, खगोल गणित आहे. रत्नागिरीत तारांगण सुरू झाले असून, त्याला जोडून अन्य दालने उभारली पाहिजेत. जिल्ह्यात विज्ञान केंद्र उभारणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अन्य महाविद्यालयातही उपकेंद्रे निर्माण व्हावीत, तेथे दुर्बिणीची व्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा साेमण यांनी व्यक्त केली.