रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने अपरिचित रत्नागिरी या विषयावर येत्या सोमवारी (ता. २७ सप्टेंबर) परिषद आयोजित केली आहे. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे कोरोनाविषयक नियम पाळून ही परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, निसर्गयात्री संस्था आणि मैत्री ग्रुपच्या सहकार्याने ही परिषद सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. उद्घाटनावेळी ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण, अजित गाडगीळ, अभिजित दातार, माजी आमदार बाळ माने, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, आणि प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक, आनंदवन निवासचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, साताऱ्याचे कृषी पर्यटन अभ्यासक प्रमोद शिंदे, रोबोटिक डिजिटल गार्डनचे प्रवीण किणे आदी मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी ही परिषद महत्त्वाची असून, यामध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यवसायात येण्यास इच्छुकांसह होम स्टे, निवास, न्याहरी योजनाचालक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे राजू भाटलेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राजू भाटलेकर, सुहास ठाकूरदेसाई, सुधीर रिसबूड किंवा मकरंद केसरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.