‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे. गावामध्ये असलेले वाद सामोपचाराने गावपातळीवरच मिटवून गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी तंटामुक्त समिती धडपडत असते. जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. पोलीस व समाजाला जवळ आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे विविध उपक्रम राबवत आहेत. जिल्ह्यात शिमगोत्सव शांततेत साजरा होत असून, पोलीस प्रशासनाला तंटामुक्त समित्या, ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोकणामध्ये गणेशोत्सव व शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिमगोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येत असल्यामुळे बऱ्याच वेळा वाद निर्माण होतात. परिणामी नाईलाजाने पोलीस प्रशासनाला १४४ कलम लागू करावे लागते. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे यावर्षी जिल्ह्यातील मांडकी (सावर्डे), येरडव, पांगरी बुद्रुक (राजापूर), नांदिवसे (अलोरे), मुरडव (संगमेश्वर) येथील शिमगोत्सवावरील बंदी उठविण्यात आली. त्यामुळे या गावात यंदा शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियानामुळे गावपातळीवरील वाद गावातच सामोपचाराने मिटविण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनातर्फेही शांतता कमिटी व ग्रामसुरक्षा दल, पोलीसपाटील यांची बैठक बोलावून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. वर्षाचा सण शांततेत व उत्साहात साजरा करीत आनंद मिळवण्याची प्रत्येकाची इच्छा असते व तो मिळावा, यासाठी शिमगोत्सवापूर्वी प्रत्येक पोलीस स्थानकात बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामस्थ व तंटामुक्त समित्यांकडून सूचनांचे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिमगोत्सव सर्वत्र शांततेत साजरा करण्यात येत आहे. मात्र, ज्या गावात वाद मिटलेले नाहीत, त्याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. त्या त्या गावातील प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.‘पोलीस व समाज’ यांना जवळ आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे विविध उपक्रम राबवत आहेत. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी युवापिढीला सहभागी करून घेत ‘प्रबोधनात्मक’ कार्यक्रम राबवण्यात आले. विविध महाविद्यालयांतून व्यसनाच्या दुष्परिणामाची माहिती देण्यात आली. तंटामुक्त अभियानामध्ये दारूबंदीला महत्त्व आहे. अनेक गावातून दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील १५ ते १६ संवेदनशील वाटणाऱ्या गावांवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येत आहे.महिलांवरील व बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांबाबत पोलीस प्रशासन नेहमीच जागरूक राहिले आहे. त्यासाठी महिला दक्षता समिती तसेच चाईल्ड वेअर फेअर कमिटीचे सहकार्य घेतले जाते. महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, रविवार (दि. ८) रोजी दोन तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या. मंडणगड व देवरूख येथील त्या तक्रारी असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस मुख्यालय व पोलीस स्थानकांमध्ये स्वागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत पोलिसांविषयीची मते व प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी समाजाचे असलेले मत व पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा कळून येण्यास मदत होत आहे.वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बीट मार्शल जिल्ह्यातील मुख्य शहरातून राबवण्यात येत आहे. पोलिसांच्या दोन ते तीन जोड्या चोवीस तास फिरत असतात. त्याठिकाणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलीस स्थानकाशी तत्काळ संपर्क साधला जातो. याशिवाय दररोज पेट्रोलिंग सुरूच आहे. औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्राशी टायप करून दररोज गाडीने परिसरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी महिला कर्मचारी कार्यरत आहेत, शिवाय उशिरा कामावरून सुटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बसस्थानक किंवा त्यांच्या निवास स्थानापर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय वेळोवेळी भंगारवाल्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.सध्या कोस्टल बीट मार्शल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सागरी पोलीस स्थानकांच्या हद्दीत मोहीम राबवण्यात येत असताना प्रत्येक सागरी पोलीस स्थानकालाही सूचना देण्यात आली आहे. शिवाय ग्रामसुरक्षा दल व कोस्टल गार्ड परिसरातील नागरिकांनाही जागृत करण्यात आले आहे. दररोज मोटारसायकलवरून पोलिसांची एक जोडी फिरून बारकाईने लक्ष ठेवत आहे. याशिवाय दररोजचे पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे.शिमगोत्सवात मानपानावरूनच बऱ्याच वेळा वाद ओढावतात. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडते. यावेळी गावातील वाद मिटवण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सामोपचाराने मार्ग काढला जातो. ग्रामस्थांचा योग्य प्रतिसाद लाभला, तर वाद मिटतात. ग्रामस्थांना आनंद मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन अखंड कार्यरत राहील. - मेहरून नाकाडे संवाद
तंटामुक्तीने निर्माण केला जनतेत दृढ विश्वास
By admin | Published: March 09, 2015 9:24 PM