लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच छोट्या मच्छीमारांच्या कार्यक्षेत्रात पर्ससीननेट आणि मिनी पर्ससीन नेटधारक नौका धुडगूस घालत असल्याने किनारपट्टीवर मच्छीमारांमध्ये पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.मागील सुमारे २५ वर्षे पर्ससीननेट आणि पारंपरिक, छोटे मच्छीमार यांच्यात वाद सुरू आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये खोल समुद्रात संघर्ष झाला होता. त्यामध्ये एकमेकांवर हल्ला करून मारहाण आणि जाळी जाळण्याच्या घटनाही घडल्या होत्या.पर्ससीन नेटधारक नौकांना १ सप्टेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीतच खोल समुद्रातील मासेमारी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या अंतरातच मासेमारी करून पर्ससीन नेटधारक नौकांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, काही अधिकाºयांना हाताशी धरून शासन निर्देश धुडकावण्याचे काम मागील काही वर्षांमध्ये करण्यात आले. आज शेकडो पर्ससीननेट नौका मासेमारी करीत असल्या तरी त्यांच्या जोडीला मिनी पर्ससीन नेट नौकाही मासेमारी करीत आहेत. प्रत्यक्षात पाहिले असता मिनी पर्ससीननेट नौकांकडे मासेमारीचा अधिकृत परवाना नसताना त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. ही मासेमारी बेकायदेशीर असली तरी शासनाचे नियम मोडीत काढून किनाºयालगत पर्ससीननेट व मिनी पर्ससीननेट नौकांकडून राजरोसपणे मासेमारी सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक, छोट्या मच्छीमारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मासेमारीवर परिणाम : किनाºयालगतच्या मासेमारीकडे दुर्लक्षपर्ससीननेट, मिनी पर्ससीन नेट आणि पारंपरिक, छोटे मच्छिमार यांना मासेमारी करण्यासाठी हद्द ठरवून दिलेली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या हद्दीमध्ये मासेमारी झाल्यास वाद होणार नाहीत. मात्र, शासनाचे नियम धाब्यावर बसवून मासेमारी सुरु आहे. याकडे संबंधित खात्याने लक्ष देण्याची मागणी मच्छिमारांकडून होत आहे.पांरपरिक, छोट्या मच्छीमारांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे किती पर्ससीननेट नौकांकडे परवाने आहेत, तसेच मिनी पर्ससीन नेट नौकांकडे परवाने नसतानाही ते मासेमारी कसे करतात, त्यांना कोणाकडून आशीर्वाद दिले जात आहेत. तसेच आर्थिक लागेबांधे असल्यानेच ही मासेमारी सुरु असल्याचा आरोपही केला जात आहे.
मच्छीमारांमध्ये पुन्हा एकदा उफाळणार संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:23 AM