चिपळुणात ‘साहेबां’चा गट पुढे, ‘दादां’चा गट शांतच; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
By संदीप बांद्रे | Published: August 14, 2023 06:04 PM2023-08-14T18:04:55+5:302023-08-14T18:05:27+5:30
सद्यस्थितीत अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी आमदार शेखर निकम यांच्यावर
संदीप बांद्रे
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात पडलेल्या फुटीमुळे कार्यकर्ता आजही संभ्रमावस्थेत आहे. त्याउलट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट सक्रिय झाला असून, पदाधिकारी निवडीलाही सुरुवात केली आहे. मात्र, अजित पवार गटात तालुका कार्यकारिणीसह अन्य पदांबाबतही तितकीच अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘साहेबां’चा गट एक पाऊल पुढे असून, ‘दादां’च्या गटात अजूनही शांतताच आहे.
सद्यस्थितीत अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी आमदार शेखर निकम यांच्यावर पडली आहे. त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग माेठा असल्याने पक्ष बांधणी करताना कार्यकर्त्यांची मने जपणे आव्हान ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेनंतर माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन शरद पवार यांना पाठिंबा दिला. जुने जाणते कार्यकर्ते या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा त्यांना जोडले गेले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी मुराद अडरेकर यांची नेमणूक करत तालुका कार्यकारिणी निवडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा गट सक्रियही झाला आहे.
अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार निकम यांनी सावर्डे येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर चिपळूण शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीनंतर आमदार निकम हे पावसाळी अधिवेशनात गुंतून गेले. या कालावधीत अजित पवार गटाकडून कार्यकारिणीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. सद्य:स्थितीत अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे खेडच्या बाबाजी जाधव यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेतच आहेत.
तालुकाध्यक्ष पद रिक्तच
अजित पवार यांचे समर्थक माजी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांना पक्षात बढती दिल्याने तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे. या पदासह तालुका कार्यकारिणीही निश्चित झालेली नाही. आतापर्यंत तालुकाध्यक्ष पदासाठी रमेश राणे, बाबू साळवी, नितीन ठसाळे आदींची नावे शर्यतीत आहेत. मात्र, याविषयी अद्याप पक्षीयस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही.
गेल्या काही महिन्यांत पक्षांतर्गत घडामोडीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातून हळूहळू प्रत्येक जण बाहेर पडत आहे. आगामी काळात तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षाचे काम जोरदारपणे सुरू केले जाईल. जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्याप्रमाणे येत्या आठ-दहा दिवसात तालुकाध्यक्षांच्या निवडी होतील. - शेखर निकम, आमदार, चिपळूण