अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा व्यवसाय बंद राहणार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परमीटधारक रिक्षाचालक मालकांना १५०० रुपये मिळणार आहेत. हे पैसे उपप्रादेशिक कार्यालयाकडून रिक्षा मालकांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही मिळणारी मदत तुटपुंजी असून, त्याची अंमलबजावणी कधीपासून हाेणार, याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून पाच किलो धान्य मोफत दिले होते. याच धर्तीवर राज्य सरकार पाच किलो धान्य मोफत देणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाकडून होणार आहे. धान्य दुकानातून संबंधित लाभार्थींना लवकरच हे धान्य दिले जाणार आहे. कडक लाॅकडाऊन असल्याने संचारबंदी केली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन करून लाभार्थ्यांना कळविले जाणार आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक रिक्षा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत येणार आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने १५०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी हाेणार, त्यासाठी नाेंदणी काेठे करावी याबाबतची काेणतीच स्पष्ट माहिती रिक्षाचालकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रमच आहे. तसेच शहरातील जुना एस.टी. स्टँड, बहादुरशेखनाका या ठिकाणी गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे याची घोषणा शासनाने केली असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.