खेड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी रविवारी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील घरडा येथील परीक्षेच्या केंद्रावरील इंटरनेट सुविधा बंद पडल्याने या परीक्षा केंद्रावर दुपार सत्रात हाेणाऱ्या परीक्षेदरम्यान गाेंधळ झाला. त्यामुळे ९०० परीक्षार्थ्यांची गैरसोय झाली. मात्र, जिल्ह्यातील उर्वरित परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७९ पदांसाठी तब्बल ८ हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी खेड येथील घरडा महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर ९०० परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी लांजा, देवरूख, रत्नागिरी, मंडणगड, दापाेली, खेडसह अन्य भागांतील परीक्षार्थी आले हाेते. नियोजित वेळापत्रकापूर्वीच सकाळी उमेदवार परीक्षा केंद्रावर दाखल झाले हाेते.परंतु, परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या उमेदवारांना अचानक परीक्षा होणार नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. इंटरनेट समस्या निर्माण झाल्यामुळे ही परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिपळूण येथे विप्रो, देवरुखातील आंबव पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि खेडमधील ज्ञानदीप येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडल्या.
रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून घरडा महाविद्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प हाेती. त्यामुळे उमेदवारांची परीक्षा हाेऊ शकली नाही. एका बॅचचे २७० विद्यार्थी अशा एकूण ९०० विद्यार्थ्यांची याच केंद्रावर येत्या दाेन दिवसांत परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले आहे.
घरडा येथील परीक्षा केंद्रावर जिल्ह्याच्या बाहेरूनही परीक्षार्थी आलेले होते. दुपारी एकच्या बॅचच्या परीक्षार्थींना दोन तास आधी परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलेले होते. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे कारण देत परीक्षार्थींना पुन्हा परत पाठवण्यात आले. सकाळी दहाची वेळ असलेल्या परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात आली. परंतु, दुपारी एक आणि सायंकाळी चारच्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या गोंधळामुळे घरी परत जावे लागले. गणपतीनंतर तुम्हाला तारीख देऊ, असे सांगण्यात आले आहे. - सिद्धेश प्रकाश साळवी, परीक्षार्थीचे पालक.