रत्नागिरी : राज्यातील सर्व नगरपरिषदांचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु हा निर्णय राज्य सरकार पुन्हा बदलणार असल्याची कुजबूज सुरू आहे. दोन महिन्यांवर निवडणुका येऊनही थेट नगराध्यक्ष आरक्षण सोडतीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने इच्छुकांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. हा निर्णय बदलला गेला तर नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणते पडणार, याचीही उत्कंठा आहे. राज्यात २००० साली नगरपरिषदांसाठी थेट नगराध्यक्ष निवडणूक घेण्यात आली होती. मात्र, त्या पध्दतीतील त्रुटी लक्षात आल्याने नंतर सरकारने पूर्ववत नगरसेवकांमधूनच नगराध्यक्ष निवडीची पध्दत सुरू ठेवली होती. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मात्र पुन्हा थेट नगराध्यक्ष निवडणुकीला मान्यता दिली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या नगरपरिषद क्षेत्रात अनेक इच्छुकांनी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची मोर्चेबांधणी केली आहे. प्रभागांची आरक्षण सोडत होऊन दोन महिने झाले. मात्र, थेट नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीबाबत कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे थेट नगराध्यक्षपद निवडणूक होईल की नाही, याबाबतच संभ्रमाचे वातावरण आहे. थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. खुले आरक्षण पडले तर किंवा महिला आरक्षण पडले तर निवडणूक कोणी लढवायची, याची यादी प्रत्येक पक्षाकडे तयार आहे. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार नसून, पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड होणार असल्याचे एक वृत्त सोशल मीडियावरूनही फिरत आहे. गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूणसह जिल्ह्यातच याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही इच्छुक उमेदवारांनी थेट पध्दतीने नगराध्यक्ष निवड होणार असल्याने याआधीच संपूर्ण शहरातील लोकांच्या गाठीभेटी घेत निवडणूक मोर्चेबांधणी केली आहे. निर्णय बदलला गेला तर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. या चारही नगरपरिषद क्षेत्रात सेना, भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेसची नगरसेवक उमेदवारांची यादीही तयार आहे. नगराध्यक्षपदाचा गुंता मात्र कायम आहे. थेट निवडणूक निर्णय कायम झाल्यास सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनाही त्यात सहभागी होता येणार आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्ष निवडणूक थेट पध्दतीने झाली नाही तर काय करायचे, याची रणनिती या चारही नगरपरिषद क्षेत्रातील राजकीय नेत्यांकडून आखली जात आहे. पक्षाचे नगरसेवक किती निवडून येतील, याचा अंदाज घेत काहींनी आपली वर्णी नगराध्यक्षपदावर कशी लागेल, यासाठीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
थेट नगराध्यक्षपदाचा संभ्रम अद्यापही कायम
By admin | Published: September 22, 2016 11:45 PM