रत्नागिरी : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावेळी शहरातील कोकणनगर येथे काही नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने तणावपूर्ण वातावरण बनले हाेते. या प्रकरणी घोषणा देणाऱ्या गटातील १०० जणांवर, तर दुसऱ्या गटातील सुमारे ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी याप्रकरणी पाच जणांना नोटीस बजावली असून, घाेषणाबाजी करणाऱ्यांचा शाेध सुरू आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पथसंचलनासाठी कोकणनगर येथील बागेच्या ठिकाणी एकत्र आले हाेते. तेथून पथसंचलनाला सुरुवात हाेताच काही जणांनी पथसंचलनाजवळ येऊन घोषणा दिल्या. या घाेषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी जमावाला रोखून धरल्याने वाद टळला. त्यानंतर संघाचे पथसंचलन कोकणनगरमार्गे शहराकडे आले.
पथसंचलनाची सांगता झाल्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकर्ते शहर पोलिस स्थानकात आले. माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांनी घाेषणाबाजी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी करत ठिय्या मांडला. पोलिसांनी तक्रार देण्याची सूचना करताच वरुण सुंदरशाम पंडित यांनी फिर्याद दिली. त्यावरून कोकणनगर येथील शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.दरम्यान, संतापलेला एक गट मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोकणनगर येथील मोहल्ल्याकडे गेला. या जमावाने चर्मालय परिसरात दोघांना मार दिला. मोहल्ल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सौम्य लाठीचार्जही केला. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पथसंचलनावेळी घाेषणा देणाऱ्या नागरिकांचा चित्रीकरणाच्या माध्यमातून पाेलिस शाेध घेत आहेत. तसेच तसेच चर्मालय परिसरात उभ्या करून ठेवलेल्या २० दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यावरूनही हाणामारी करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
दंगल नियंत्रण पथक तैनातकोकणनगर येथे तणावपूर्ण वातावरण बनले आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह राखीव पोलिस दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.