रत्नागिरी : जिल्ह्यात २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत विविध सण साजरे होणार आहेत. या काळात विविध राजकीय दाैरे तसेच आंदोलने होणार आहेत. या अनुषंगाने या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश कायदा व सुव्यवस्थेसाठी लागू करण्यात आला असला तरी पर्यटनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पर्यटकांनी निर्भयपणे जिल्ह्यात पर्यटनासाठी यावे, त्यांना पुर्णपणे सुरक्षा दिली जाईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ५ मे रोजी बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसु, धोपेश्वर, पन्हेळे तर्फे राजापूर, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजुबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने २४ एप्रिलपासून माती परिक्षणासाठी ड्रिलींग कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाला प्रकल्प बाधीत गावातील काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याने या कामादरम्यान स्थानिकांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशाद्वारे जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र, जिल्ह्यात ११ मे पर्यंत मनाई आदेश असल्याने पर्यटकांनी येताना खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात यावे की न यावे, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ मे पर्यंत विविध सण साजरे होणार असून काही ठिकाणी मोर्चे - आंदोलनाची स्थितीही निर्माण होणार आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जबावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनावर काेणताच परिणाम होणार नाही, पर्यटक जिल्ह्यात निर्भयपणे फिरू शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ११ मे पर्यंत असलेला मनाई आदेश कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आहे. पर्यटक कुठलीही भीती अथवा संभ्रमावस्था न बाळगता रत्नागिरी जिल्ह्यात निर्भयपणे येऊ शकतात. मनसोक्त पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. त्यांना पुर्णपणे सुरक्षा दिली जाईल. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक, रत्नागिरी