चिपळूण : शहरात महापूर ओसरल्यानंतर कोविड लसीकरणाची मोहीम जोरदारपणे सुरू झाली आहे. मंगळवारी शहरात विविध ठिकाणी लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी शिबिर आयोजित केली होती. शहरातील पेठमाप येथे शिबिर सुरू होत असतानाच, शिबिरासाठी चुकीची जागा निवडल्याचा आक्षेप घेत काहींनी आरोग्य विभागाने आणलेली यंत्रणाच दुसऱ्या ठिकाणी नेली. यावरून येथे प्रचंड गोंधळ व काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथे २२ व २३ जुलैरोजी महापुरामुळे हाहाकार माजला होता. या महापुरातून अजूनही चिपळूण सावरलेले नाही. शहरातील विविध भागांत साफसफाई व चिखल काढण्याचे काम सुरू आहे. त्यातच शहरातील काही भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने आरोग्य विभागाकडून उपाय योजना सुरू केली आहे. त्या जोडीला कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पुन्हा लसीकरण मोहीम सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात दोन विभाग तयार करून त्याठिकाणी लसीकरणाचे शिबिर घेतले जात आहेत. प्रत्येक केंद्रावर लसीकरणाचे ५० डोस पुरवले जात आहेत. सोमवारी लसीचा पहिला डोस देण्यात आला, तर मंगळवारी कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यासाठी शिबिरे घेण्यात आली.
शहरातील पेठमाप येथे साळी समाज मंदिर व विठ्ठल मंदिर येथे शिबिर होणार होती. त्यानुसार दोन्ही ठिकाणी नागरिक सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभे होते. आरोग्य विभागाची यंत्रणाही पेठमाप येथे नियोजित वेळी आली. मात्र याआधीचे शिबिर साळी समाज मंदिरऐवजी कालिका माता मंदिर येथे झाले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने कालिका माता मंदिर येथेच लसीकरण सुरू केले. या प्रकारामुळे साळी समाज मंदिर इथे रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांनी थेट कालिका माता मंदिर येथे येऊन आरोग्य विभागाला जाब विचारला. तसेच लसीकरणाची यंत्रणा उचलून साळी समाज मंदिर येथे आणली. यावरून जोरदार गदारोळ माजला. मात्र त्यानंतर काहीसे तणावाचे वातावरण शांत होतात, लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.