लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : राज्यस्तरावर महाविकास आघाडी कार्यरत असली तरी स्थानिक स्तरावर परिस्थिती पाहून आघाडी करावी. जिल्ह्यात एक वेळ काँग्रेस-भाजप परवडली. मात्र, शिवसेनेशी घरोबा करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावर्डे येथे शुक्रवारी झालेल्या जिल्हा बैठकीत जिल्ह्यातील बहुतांशी तालुकाध्यक्षांनी व्यक्त केले. दरम्यान, चिपळुणातील पुराच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे वगळता एक ही मंत्री पूरपरिस्थितीची पाहणी दौऱ्यावर न आल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सावर्डे (ता. चिपळूण) येथे शुक्रवारी आयोजित केली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, रमेश कदम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, महिला आघाडी व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर येथील तालुकाध्यक्ष व विधानसभा क्षेत्राध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील राजकीय परिस्थिती मांडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीवरही सर्वांनी आपली मत व्यक्त केली. या बैठकीत काँग्रेससोबतच नैसर्गिक आघाडी करावी, अशी अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली. काही तालुक्यात तर भाजपसोबत असली तरी चालेल, पण शिवसेना नको, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत कोणाची आघाडी करायची आणि कोणाशी नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. पण, नैसर्गिकरीत्या जी आघाडी हाेईल ती सर्वांना मान्य करावी लागेल. मात्र, त्यापूर्वी आपल्या तालुक्यातील पंचायत समित्या व नगरपंचायती जिंकण्यासाठी आपणच कामाला लागले पाहिजे. आपली राजकीय ताकद दाखविल्याशिवाय आपल्याला काेणी जवळ करणार नाहीत. आपली राजकीय ताकद दिसली तर निश्चितच सत्तेचा वाटा आपल्याला मिळेल, असे सांगितले. आमदार निकम यांनी महापुराच्या कालावधीत अचूक नियोजन करीत मदत वाटपात मोठ्याप्रमाणावर आघाडी घेतली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार शेखर निकम म्हणाले की, कोणासोबत आघाडी करावी त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईलच. परंतु, चिपळूणसह जिल्ह्यातील नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. चिपळुणात आलेल्या महापुरात कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन मदत वाटपात योगदान दिले. त्यामुळेच राष्ट्रवादी आघाडीवर राहिला. हा माझा सन्मान नसून सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे.
-------------------------
ओसाड गावचा सेनापतिपद घेऊन थकलो : रमेश कदम
गेल्या दीड वर्षात पक्षाने आपल्यावर कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही. मात्र, आता ओसाड गावचा सेनापती पद सांभाळून थकलोय. पक्षाने आता कोणतीतरी जबाबदारी द्यावी, अशी विनवणी माजी आमदार रमेश कदम यांनी केली. त्याचवेळी त्यांनी २००५च्या महापुरावेळी दुसऱ्याच दिवशी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी भेट दिल्याने यंत्रणा वेगाने हलली होती. यावेळी एकही केंद्रीय किंवा राज्यमंत्री आलेला नाही, अशी खंतही व्यक्त केली. यावर खासदार सुनील तटकरे यांनी तुमच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविल्या जातील, असे बोलून वेळ मारून नेली.