चिपळूण : केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे आज, २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.
याबाबत यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले. देशात बेरोजगारी वाढत असून, तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. केंद्र सरकारने या हुकूमशाहीने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणले. उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. याविराेधात काॅंग्रेसने भारत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.