रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:12 PM2024-09-28T18:12:40+5:302024-09-28T18:13:02+5:30
तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३० वर्षे फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या काँग्रेसने महाविकास आघाडीकडे जिल्ह्यातील पाचपैकी राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात आघाडी म्हणून काँग्रेसच्या ‘हाता’त काय पडणार, असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
एकेकाळी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेसला शिवसेनेचा उदय झाल्यानंतर उतरती कळा लागली. १९९० साली राजापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. ल. रं. हातणकर विजयी झाले, तो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा पक्ष म्हणून जिल्ह्यातील शेवटचा विजय होता. त्यानंतरच्या काळात गणपत कदम (राजापूर) आणि सुभाष बने (संगमेश्वर) या दोघांनी काँग्रेसचे आमदार म्हणून विजय मिळवला असला तरी त्यात पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक आणि त्यातही कोकणचे नेते नारायण राणे यांचा हातभार मोठा होता. या दोघांच्या विजयाच्या आधारे काँग्रेसला फार मोठी उभारी घेता आली नाही.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस अधिकच क्षीण झाली. १९९९, २००४ आणि २००९ अशी सलग १५ वर्षे राज्यातील सत्ता काँग्रेस आघाडीकडे होती. पण, या काळातही जिल्ह्यात काँग्रेसला उभारी घेता आली नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात चांगले स्थान मिळवले. शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि विधानसभेच्या पटलावरही आपला प्रभाव दाखवला.
गेल्या काही वर्षांत हुस्नबानू खलिफे आणि जमीर खलिफे यांच्या रुपाने राजापुरात काँग्रेस टिकून आहे. त्याच्या खेरीज चिपळूण शहरात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवले आहे. अन्य कोठेही काँग्रेसची ताकद फार मोठी नाही. अर्थात राजापूर आणि चिपळूणच्या ग्रामीण भागातही शिवसेनेचे वर्चस्व कायमच अबाधित राहले आहे. त्यामुळेच १९९० नंतर पक्ष म्हणून काँग्रेसला कधीही विजय मिळाला नाही. हातणकर यांचा विजय त्यांची वैयक्तिक निष्कलंक प्रतिमा आणि तळागाळात रुजलेव्या काँग्रेसचा होता. त्यानंतर काँग्रेसला ते जुने दिवस कधीही दिसलेले नाहीत.
आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने निम्मी शिवसेना आणि निम्मी राष्ट्रवादी सोबत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.